आरोग्यलेखांचे आजार

DFC ची WEBSITE दिमाखदार  ‘ जल्लोषात ‘ सादर करणा-या WEBAPP TEAM चे मनःपुर्वक अभिनंदन!

डॅा. हिर्लेकरांचा फोन आला सर आरोग्यावर एक Medical Lकिंवा Non – Medical  आर्टीकल पाडा. आम्ही Professional लेखक नाही त्यामुळे आम्ही लेख लिहीत नाही तर तो पाडतो. लेखाची सुरवात आणि शीर्षक सुबक सुंदर तरूणी सारखे आकर्षक असेल तरच तो वाचला जातो. आता आपण ह्यदयविकारावर थोडी माहिती जाणून घेणार आहोत अशी सुरूवात केल्यास वाचक त्याला काडीचेही तोंड लावणार नाहीत. लाखो हृदयाची धडकन मधुबाला डॅा च्या दवाखान्यात छाती धडधडते म्हणून शिरली. आपली अखेर Primary Pulmonary Hypertension हया ह्यदयरोगाने होईल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. अमिताब बच्चनला मायासथेनी या नावाचा आजार आहे एकदा त्याचे काय झाले …

(आता पुढचा लेख तुम्हाला दोन्ही आजार नसले तरी नक्की वाचले जातील)

थोडक्यात आरोग्यलेखाची सुरूवात आकर्षक हवी. “You never get second chance for the first impression” हेच खरे! आयला, मग आरोग्यलेख डॅाक्टरांसाठी किंवा Non – medico साठी कसे लिहावेत यावरच का लिहू नये, असा विचार मनात चमकुन गेला, आणि हा लेख पाडला !

Web मध्ये तर smiley पण टाकता येते. (इतरांनी smile दिलीच पाहिजे असेही नाही !)

आरोग्यलेख आणि web वरील माहिती नेहमी खरेच बोलतात. थोडेफार का होईना, प्रबोधन करतात. ते नेहमी आजारी आणि निस्तेज का असतात? कारण आरोग्याची बहुतेक माहिती क्लिष्ट असते. ती वाचवण्याची गरजच काय पैसे टाकले की ट्रीटमेंट मिळते. आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणे, आजारी नसणे अशी चुकीची कल्पना आपल्या मनात खोलवर रुजली आहे. ती काढुन टाकताना लेखकांचे टाके ढिले होतात. जागतिक आरेाग्य संघटनेची आरोग्याची व्याख्या काय तर आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव नव्हे. रोग न होणे. मानसिक, शारीररिक, सामजिक आणि दैविक निरोगीपण व संतुलन म्हणजे आरोग्य या चार गोष्टी ठीक असतील तर या जगात ‘ आनंदी आनंद  इकडे तिकउे चोहीकडे ‘  कविता कृतार्थ होईल. पण Non medico साठी लिहिताना काही सन्माननीय अपवाद सोडले तर आजचे आरोग्य लेखक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि दैविक या चार गोष्टीपैकी फक्त शारीरिक गोष्टीना अनन्यसाधारण महत्त्व देतात. त्यामुळे भाषा क्लिष्ट होते. विषय गंभीर बनतो. न समजणारे मेडिकलचे शब्द लेखात घुसतात. समोरचा माणुस मेडिकलचे काहीही ज्ञान नसलेला सामान्य माणुस आहे हे विसरले जाते. काही लेख तर लक्षणे, तपासण्या, प्रयोगशाळेतील रिपोर्ट,  वेगवेगळी निदाने याबद्दल जणु काही समोरचा वाचणारा हा एम.बी.बी.एस.च्या किंवा एम. डी. च्या परीक्षेला बसणारा विदयार्थ्यीच आहे, अशी कल्पना करूनच लिहिले जातात. हे लेख मग डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफच वाचतो. त्यांना आजाराचे प्राथमिक ज्ञान असते. लेखक कायम त्यांचे ज्ञान कसे वाढेल आणि आपण किती उच्चशिक्षित, गंभीर, गाढे अभ्यासक आहोत हे पटवण्याच्या प्रयत्नात असतात. सामान्य जनतेचे प्रबोधन करायचे तर समोरचा ‘कोणता क्लास‘ आपले लेख वाचणार आहे याची कल्पना हवी. त्याच्या शारीरिक नव्हे सामाजिक जीवनात त्या आजारामुळे कुठली स्थित्यंतरे घडणार याची माहिती हवी. मला आमचे सर डॉ. अनिल तेंडोलकर  जाम आवडतात. खरं तर हदयरोगावरील ऑपरेशनचे ते द्रोणाचार्य आणि (सचिन) तेंडुलकर, देखील! पण खेडयातील डॉक्टरांचे लेक्चर घ्यायला बोलावले की हा माणूस गुंतागुतीच्या क्लिष्ट ऑपरेशनमधली हवाच काढुन घेतो. एवढया साध्या, सोप्या, सुटसुटीत विनोदी शैलीने  Slides दाखवत बॅटिग करतो की सर्जरी हा धंदा सर्वात सोपा वाटावा.

आरोग्यलेखकांच्या लेखात आपण गंभीर आहोत, सुपरस्पेशलीस्ट आहोत असे समजुन  अवजड भाषा येऊ लागली की लोकच असे लेख टाळु लागतात.

अशा लेखकांना योग्य वेळी वेबच्या सपांदकानी कानपिचक्या दयाव्यात. (मग भले ते एम. डी……., एम.एस. असोत) आपल्या ग्राहकांचा वैदयकीय, मानसिक समज (आय क्यु) किती आहे याची लेखकांना वांरवार जाणीव करुन त्यांनीच हा आजार टाळावा, या व्हायरस इन्फेक्शनची लागण मग जवळच्या लेखांना देखील होते, हे तर फारच वाईट.

आरोग्यलेखाची कडु गोळी साधी, सोपी , सुटसुटीत आणि विनोदाची साखपेरणी केलेली पाहिजे. मी साहित्यिक नाही. त्यामुळे आरोग्य लेख लिहायचा एक साधा प्रेाटोकॉल (फॉम्युला) तयार केला. अब्राहम लिंकन साहित्य वाचले. हा ग्रेट माणुस मोलकरणीपासुन ते खासदारापर्यत कोणालाही कठीण गोष्ट पटवायची असेल तर त्याची सुरुवात विनोदी गोष्ट सांगुन करायचा. पुढचा पॅरेग्राफ किंवा गोष्ट नक्की ऐकली जाणार याची खात्री. त्याच वेळी कडु गोष्ट सांगुन टाकायची . शिरीष कणेकर आणि व्दारकानाथ संझगिरी हे माझे आवडते लेखक (कला आणि क्रीडा क्षेत्रातले गरिबांचे पु.ल.) कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या आणि उपमांचा चटकदार मसाला मारण्यात दोघेही पटाईत. त्यांची स्टाईल आरोगयलेखकांनी चोरावी काय? (काय हरकत आहे.) पोस्टमार्टम नक्कल करायला देखील अक्कल लागते. (अन्नु मलिक, शाहरुख झिंदाबाद) डॉ.तेंडोलकर, अब्राहम लिंकन, संझगिरी ही मिसळ छानच होईल, किमान असे लेख तरी वाचले जातील. आणि मग  मी आरोग्याचे पोस्टमार्टम नावाचे पुस्तक लिहिले ! हे लेख दर रविवारच्या ‘लोकसत्ता’ पुरवणीत प्रसिध्द झाले !  !

आरोग्यावर असे प्लॅन करून लेख लिहीताना फार मोठा धक्का असतो. ‘एडस‘ हा अत्यंत खतरनाक आजार झाल तर शिक्षा एकच मृत्यु. फक्त माझ्या एकटयाकडेच या आजाराचे दोन वर्षात सत्तर पेशंट सापडल्यावर मी हादरलो. एडसचे  प्रबोधन त्वरित  केले पाहिजे. लोकांना समजतील असे सुटसुटीत विनोदी गोष्टी सांगुन सुरुवातीला लिहिले. काही  पेशंट म्हणाले, तुमचे ‘एडस‘ चे जोक छानच होते. (मला स्वत:चेच पोस्टमार्टेम झाल्यासारखे वाटले). म्हणजे क्रीडालेखक संझगिरी आवडतात म्हटल्यावर, एक नाजुक नगराध्यक्षा म्हणाली,‘ राजकारणावर किती सुंदर लिहीतात. उपमा किती छान-छान  असतात. पण क्रिकेटवरच्या उपमा फार असतात बाई!‘(लेखकाला ब्रेवॉर्न स्टेडियम पोटात घेईल तर बरे असे वाटले असेल  (DFC च्या संझगिरीनी ह्याची नोंद घ्यावी. ) आरोग्यलेखकांनी विनोद आणि प्रबोधन यांचा समन्वय  साधला पाहिजे . पण हे फार अवघड आहे. कधी विनोद जास्त तर माहिती कमी होण्याचा धोका. तर कधी उलटे, इतर लेखासारखे आरोग्यालेखात हे चालत नाही. असे लेख मग विनोदी आणि आजारी वाटतात. आता ‘मी लिखाण थांबवु शकत नाही. कारण मी फार प्रसिध्द झालो आहे.’ ही मानसिकताच चुकिची आहे.म्हणुन लिखाण थांबवलेल्या पुल आणि वपुंबददल मला नितांत आदर आहे. हे  म्हणजे नेहरू गेले, शास्त्री गेले, माझीही प्रकृती बरी नाही म्हणणाऱ्या सारखे झाले.

आरोग्यलेखांचा आणखी एक आजार म्हणजे ज्या आजारावर तो लिहिलेला असेल  त्याच रोगाचे पेशंटच  तो लेख वाचतात. ब्लडप्रेशरचा पेशंट मधुमेहाच्या लेखाला तोंड लावत नाही. पण चाळिशीनंतर हे सगळे आजार “ पहले तु एंट्री मार बाद में हम आते है ” म्हणत येतात. रोग टाळणे हाच बरे होण्याचा उत्कृष्ट मार्ग आहे. (प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर काही ‘एडस’ सारख्या आजारात तर प्रिव्हेशन इज द ओनली क्युअर.) म्हणून जवळजवळ सर्वच आजारांची  प्राथमिक माहिती प्रत्येक सुशिक्षित माणसाला हवी.

Web वर आपल्या आजाराची माहिती मिळवून consult ला येणारी एक खतरनाक मंडळी OPD त असतात. आपणाला डॉक्टर पेक्षा कशी जास्त माहिती आहे हे पटवून आपण आज डॉक्टर कडे आलेला सर्वात हुशार पेशंट आहोत हे दाखवण्याच्या ते प्रयत्नात असतात. अशा पेशंटना आम्ही Google Patient म्हणतो. आपल्या आजाराची माहिती गुगलवर अवश्य वाचावी! पण हि माहिती डॉक्टरना सांगून त्यांचा अमूल्य वेळ वाया घालवू नये !

मेडीकोजना लिहित असणाऱ्या आर्टीकलमध्ये  ही  Diarrhoea of theoretical knowledge & constipation of practical points असूच नयेत, किमान एकदा तरी कायमचा लक्षात राहणारा  “Massage Home” दिला गेलाच पाहिजे. उदाहरणार्थ,एखादा हार्टअॅटॅकचा पेशंट चक्कर येऊन खाली पडला, त्याचे अंग घामानी प्रचंड भिजून गेले पल्स लागत नाही, बी पी कमी आहे, अशा वेळी Sorbitrate ची गोळी त्याला बिलकुल देऊ नये. त्याची प्रकृती आणखी ढासळेल. त्याला Injection Dexa तर बिलकुल देऊ नये ! Injection Adrenalin intramuscular दयावे. जर Cardiopulmonary arrest असेल तर CPR (Resuscitation) करावे ! आणि आय व्ही साठी व्हेन शोधत बसू नये ! लगेच हॉस्पिटल मध्ये शिफ्ट करावे. हा Massage Home देऊन हृदयविकारावरील लेख  General practitioner साठी असला तर असा संपवायला हरकत नाही. (पेशंट नव्हे लेख म्हणतोय मी !)

लेखाची सुरुवात आकर्षक केल्यास व मध्ये भरकटत गेल्यास हा आता सुधरेल मग सुधरेल अशी आशा अपेक्षा ठेऊन वाचक तो  लेख शेवटपर्यंत वाचतात. आम्ही सुद्धा पुढील Web साहित्यात आम्हाला सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी कबुली देऊनच जल्लोषात आपले स्वागत करतो.

WISHING YOU HAPPY & HEALTHY NEW YEAR!

डॉ. विवेक रेडकर, M.D. (Med.)
रेडकर हॉस्पिटल आणि  रिसर्च सेंटर, मालवण आणि रेडी , ता. वेंगुर्ला.

Did you like this article??