भारतीय सण,रूढीपरंपरा आणि संस्कृती या मागील वैज्ञानिकता – वै. श्री. सुविनय दामले, कुडाळ.

भारतीय सण,रूढीपरंपरा  आणि संस्कृती या मागील वैज्ञानिकता.

 

सण साजरे  करण्यामध्ये परंपरागत रूढी,चालीरिती जशा महत्वाचा, भाग घेतात तसाच आध्यात्मिक,सामाजिक,आशय देखील असतो. सण साजरे करणे ही जशी भक्तीमार्गातील उपासना पध्दत आहे तशी ती कर्म मार्गातील उपासना देखील आहे,ज्यात वेगवेगळी कर्म कांडे केली जातात. या अशा सर्व सणांचा ज्ञानमार्गातील अर्थ काय आहे हे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया ! भक्तीमार्गातील आध्यात्मिक पातळीवरील अर्थ प्रस्तुत लेखात दिलेला नाही. हा  नवीन अर्थ बरोबरच असेल असा लेखकाचा दावा नाही, पण विचाराला वेगळी चालना मिळावी म्हणून आयुर्वेदीय वैद्यकाच्या दृष्टीने समर्थ प्रेरणेने हे लिखाण करीत आहे.चुकभूल देणे घेणे.

भारतीय संस्कृतीमध्ये सणांचे वर्णन प्रत्येक तिथीला आहे. मराठी महिन्यातील कोणतीही तिथी काढा त्या तिथीला एखादा सण जोडून दिलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी या सणांची रचना पुनः एकदा लावली आहे. या सणांच्या क्रमाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की हे सर्व सण विशिष्ट ऋतुमध्ये विशिष्ट वातावरणात साजरे केले जातात. त्या सणांचा विशिष्ट आहार असतो. हजारो वर्षांची ही परंपरा आहे. हिंदु धर्मावर असंख्य आक्रमणे होऊन सुध्दा अजूनही विशेष बदल न होता हे सर्व सण आपण साजरे करीत आहोत. यातच  या सणांचे चिरंजिवित्व सिध्द होते. जसे दिवाळी हा सण थंडी सुरू झाली की सुरू होतो.निसर्गतः भूक चांगली असते. या भूकेच्या वेळी पौष्टीक खुराक जर शरीराला मिळाला तर शरीराचे पोषण उत्तम होते. तळलेल्या पदार्थातून आपणाला उत्तम पोषणमूल्य मिळत असतात. म्हणून दिवाळीचा फराळ हा तळलेला असतो.या उलट गणपती येतात त्यावेळी पावसाचे प्रमाण अनियमित असते. कधी तरी भरपूर उन तर कधी तरी मुसळधार पाऊस असे बदलते वातावरण असते. म्हणून गणपतीला दाखविलेला नैवेद्य हा उकडलेल्या मोदकांचा असतो.भाताच्या अथवा साळीच्या  लाहयापासून केलेले पंचखाद्य असते. हरितालीका,ऋषीपंचमी असे नानाविध उपवासाचे सणही याच महिन्यात असतात. दिवाळीच्या दिवशी सकाळी सर्वत्र पोहे व तळलेला फराळ खाल्ला जातो.त्याअगोदर आमच्या गावाकडे सातवीण नावाच्या झाडाच्या सालीचा रस काढून त्यात लिंबूरस,सैंधव,हिंग,जिरे इ. पाचक पदार्थ टाकून छान तीर्थ केले जाते. व ते सर्वांना दिले जाते.शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दिलेले हे बूस्टर डोसआहेत जे दरवर्षी घ्यावे लागतात, तरच शरीराची प्रतिकारशक्ती काम करते जी एडससारख्या आजारांना तोंड देण्यास समर्थ असते.असेच तीर्थगुडीपाडव्याला कडूनिंबाच्या पानांचे दिले जाते. गावच्या पध्दतीनुसार त्यातील घटक द्रव्ये बदलत असतील पण,आरोग्य रक्षण करणे हा उद्देश मात्र सारखाच असतो. सायंकाळी म्हटली जाणारी दिव्याची प्रार्थना आता ऐकू येईनाशी झाली आहे.

शुभं करोती कल्याणम,आरोग्यम धन संपदा या ओळीत धनाबरोबरच  आरोग्याची प्राप्ती दडलेली आहे. कोणीतरी अनुभव घेतल्याशिवाय या श्लोकांची निर्मिती केलीच नसणार,याचा अर्थ दिवा लावल्यामुळे आयुष्यात वाढ नक्की होत असली पाहिजे ती कशी होत असेल ते आपण शोधले पाहिजे. सायंकाळी दिवा लावल्यावर त्या ज्योतीच्या प्रकाशाच्या आकर्षणामुळे शेकडो किटक दिव्याभोवती गोळा झालेले आपणाला दिसतात.जसे स्थूल रूपात केवळ डोळयांना दिसणारेच मोठे किटक असतात असे नव्हे तर अतिसूक्ष्म रूपातील किटक सुध्दा त्या दिव्याच्या ज्योतीच्या आकर्षणामुळे येत असतात.किटकांचा स्वभावच ज्योतीत विलीन होऊन जाणे हा असल्याने वातावरणातील सूक्ष्म व स्थूल रूपातील उपद्रवी किटक जळून नष्ट होत असतात. परिणामी वातावरण निर्जंतुक राहायला मदत होतेच ना ! आज व्यवहारातसुध्दा कासवछाप वा तत्सम धूर निर्माण करणारी उदबत्ती लावली तर डास नाहीसे होतात तसे दिवा जळत असताना जो धूर निर्माण होतो तो धूर सुध्दा तेवढाच परिणामकारक असतो. म्हणून दिवा हा आरोग्याचं रक्षण करणारा सांगितला आहे. वातावरणात अदृश्य असे काही अतिसूक्ष्म जीव जंतु असतात,ज्यांनी  आपल्या शरीरात प्रवेश केल्यामुळे काही व्याधीदेखील शरीरात प्रवेश करतात, ते शरीरात कोठून प्रवेश करतात तो मार्ग दिसत नाही पण शरीरात प्रवेश केल्यानंतर वाईट परिणाम मात्र दिसतात,अशा घटकांना राक्षस वा भूते अशी संज्ञा ऋषींनी दिली असावी. आज शोधले गेलेले व्हायरस वा बॅक्टेरिया हे पूर्वी वर्णन केलेल्या राक्षस किंवा भूतांपैकीच कोणीतरी असावेत. आज मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आपण व्हायरस,बॅक्टेरियांचा आकार सुध्दा तपासू शकतो,परंतु कोणतीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या ऋषीमुनींनी केवळ अनुभव व तर्काच्या आधारे आजची वैज्ञानिक सत्ये हजारो वर्षांपूर्वी सांगितली होती.त्यांच्या या दिव्यदृष्टीला त्रिवार वंदन !

संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असा अभंग लिहून वनस्पतींची किर्ती अजरामर केली आहे.  वड,दुर्वा,बेल,तुळस,कडुनिंब,शमी इ. कितीतरी वनस्पती पूजेकरीता वापरल्या जातात.एक तर वनस्पतींचे पूजन तरी केले जाते किंवा वनस्पतींचा वापर देवतांच्या पूजनाकरीता केला जातो. “जे देवाला,ते देहाला”हा नियम लावून पाहिल्यास प्रत्येक वनस्पतीचा औषधी गुण सणाच्या निमित्ताने चर्चेला यावा. पुढील पिढीला त्याची योग्य ओळख व्हावी हा त्या पूजनामागील हेतू आहे. अखंड वडाच्या झाडाच्या पूजनाऐवजी वडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करायला कोणत्याही धार्मिक ग्रंथात सांगितलेले नाही. हे मुद्दाम या ठिकाणी सांगावेसे वाटते. अशा पूजनाने देव संतुष्ट होईल की कोपेल हे ज्याचे त्याने ठरवावे. नदीच्या अथवा समुद्राच्या काठी जी नारळाची प्रचंड झाडे दिसतात,ती नारळी पौर्णिमा या सणाची कृपा आहे. नदीत अथवा समुद्रात कृतज्ञता म्हणून अर्पण केलेला नारळ काठावर जाउन रूजतो व त्यांचा मोठा वृक्ष होतो. आणि इतरांना पुनः भरपूर फळे देतो. हे काठावरचे जुने मोठे कल्पवृक्ष कोणी मुद्दाम लावलेले नाहीत,हे लक्षात घ्यावे लागेल. जे निसर्गाचे आहे त्याला परत करावे ही उदात्त भावना हा सण साजरी करण्यामध्ये आहे. बुध्दीप्रामाण्यवादी लोक अंधश्रध्देने या सणांकडे पाहातात त्यांना मात्र “दहा रूपये किंमतीचा नारळ पाण्यात टाकला !” यापेक्षा काहीही दिसत नाही. म्हणोत बापडे ! देव त्यांना क्षमा करो !!

शरद ऋतुतील आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला कोजागिरी ही देवी को ऽ जागरती को ऽ जागरती असे म्हणत रात्रौ प्रत्येकाच्या घरी फिरत व जागरण करीत असलेल्या माणसांवर आपली कृपा ठेवते,असा पौराणिक संदर्भ आहे.हा ऋतु -म्हणजे यावेळचे वातावरण- पित्त वाढविणारा असतो. म्हणूनच तर वैद्यांनाम् शारदी माता असे शरद ऋतुला म्हटले जाते. म्हणजेच वैद्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी आई जशी घेते त्याप्रमाणे शरद ऋतु घेत असतो.

चंद्रप्रकाशात पसरून ठेवलेले व आटवलेले दूध ज्यामध्ये वेलची,जायफळ,केशर,साखर इ.सुगंधीत पदार्थ घातलेले असतात.मनाला प्रिय असलेले नातेवाईक मित्रमंडळी बरोबर असतात,एखाद्या तलावाच्या काठी किंवा नदीच्या किनारी सर्वजण बसून हास्य विनोद गायन वादन नृत्य आदि करमणूक करीत असतात.ही “सिच्युएशन”पित्त प्रकोप कमी करणारी असते. पित्ताच्या प्रमुख चिकित्सेमध्ये काय करावे असा सल्ला देताना आचार्य म्हणतात,

पित्तस्य उपक्रमः-(पित्ताची चिकित्सा)

सुगन्धशीत हृद्यानां गन्धानाम् उपसेवनम।…

प्रदोष चंद्रमाः सौंधम्हारिगीतं हिमोऽनिलः।…

अयंत्रणसुखं मित्रं पुत्रः सन्दिग्ध मुग्धवाक् ।…

सुतीर्थ विपुलस्वच्छसलीलाशयसैकते ।…

………………….।।

म्हणजेच पित्त वाढलेले असताना वा वाढू नये म्हणून वरील उपचार करावेत.आता यातील सर्व उपचार कोजागिरीच्या रात्री केले जातातच. सणाच्या निमित्ताने आपल्याकडून आरोग्य पालन करून घेतले जाते. एवढेच !

गृहप्रवेश करताना एखादा छोटासा होम केला जातोच. त्यातील कर्मकांडदेखील आवश्यक आहे. कारण त्याने समाजाचे पोषणच होत असते.आता साधी वास्तुशांत करायची ठरल्यास त्यासाठी जी सामानाची यादी केली जाते त्यात एक दगडी पेटी,जी पाथरवटाकडून सन्मानाने आणली जाते. एक सोन्याची प्रतिमा,जी सोनाराकडून आणावी लागते. सात नद्यांचे पाणी,सात प्रकारच्या औषधी वनस्पती,सात प्रकारची माती आणावी लागते,एखादा वैद्य किंवा कोळी हे काम करतो ज्याचा त्याला मोबदलाही मिळतो. नवीन वस्त्र लागते जे कोष्टी किंवा वीणकर विकत देत असतो.नवीन मातीची मडकी लागतात जी कुंभाराकडून खरेदी करावी लागतात.वेगवेगळी फुले लागतात जी माळी देत असतो. होमासाठी समिधा लागतात त्या जंगलातून तोडून देण्याचे काम कोणीतरी मोबदला घेऊन करून देतो,शरीरशुध्दीसाठी केस कापावे लागतात. रोजगार न्हाव्याला मिळतो. वास्तुशांतीकरीता ब्राह्मणाकडून पूजाविधी करवून घेतला जातो.त्याला दक्षिणा दिली जाते. समारंभाला येणाऱ्या पाहुणेमंडळींसाठी स्वयंपाक बनवावा लागतो,त्यासाठी धान्याची खरेदी, घरकामासाठी  बायकामंडळी,स्वयंपाकी,मंडपाची उभारणी, एक घर उभे करीत असताना आपण नकळतपणे आणखी कितीतरी घरे उभारत असतो. जोडत असतो. त्यामुळे यातील कर्मकांडाचा भाग देखील अत्यंत आवश्यक आहे. चालीरिती जोपासणे – लग्नविधीमध्ये हळद लावणे,मेंदी लावणे हे विधी केले जातात. हे व्यवहारात दिसते कि जोपर्यंत मुलीचे लग्न ठरत नाही तोपर्यत तिची मासीक पाळी अगदी नियमित असते. लग्न ठरले कि तिच्यामध्ये भावनिक बदल होण्यास सुरवात होते.म्हणजे मन अस्थिर होऊ लागते.मनाचा परिणाम अंतःस्रावी ग्रंथींवर पर्यायाने हार्मोन्सवर होत असतो.हार्मोन्समध्ये बदल झाला कि मासीक पाळीमध्ये बदल होतो.हा बदल कमी व्हावा म्हणून मनाला संतुलीत करण्यासाठी सर्व अंगाला हळद लावली जाते किंवा मेंदी लावतात. मेंदी ही तळहात,तळपाय व केस यांना लावतात तर हळद बाकी सर्व अंगाला लावतात. महाराष्ट्रात काही भागात तर हळद लावण्यासाठी संपूर्ण दिवस राखीव ठेवलेला असतो. हळद रक्ताला शुध्द करते म्हणजे नेमकं काय करते ? तर रक्तातील विजातीय दूर करते. रक्तात वाढलेले दोष जसे,अंतःस्रावी ग्रंथीतील अतिरिक्त स्राव,घामावाटे,लघवीवाटे बाहेर काढले जातात. म्हणूनच या लेपन चिकित्सेचा  लग्नविधीमध्ये समावेश केला आहे. लिहायचे झाल्यास पानेच्या पाने पुरणार नाहीत,लेखनाला मर्यादा येतेच म्हणून थांबावे लागते इतकेच. पण आपल्या हिंदुच्या सणांकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी या लेखाने प्राप्त व्हावी एवढीच अपेक्षा !

 

वैद्य सुविनय दामले  कुडाळ सिंधुदुर्ग.

दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी, गुरूदत्त हाऊ.सोसायटी,ए-3. पहिला मजला, टॉपटेन मोबाईलच्या वर पटेल चौक, घाटकोपर येथे रूग्णतपासणी करीता उपलब्ध. दूरध्वनी  9324221553

This Post Has 4 Comments

 1. somnath parab

  खूपच छान माहिती

  1. Hemantkumar P. Sawant

   उत्कृष्ट लेखन सुविनय . शुद्ध मनाने विचार केला तर प्रत्येक भारतीय सणात वैज्ञानिक दृष्टिकोन दिसेल . गरज आहे पांघरलेले वेड फेकून द्यायची .

 2. वैद्य सुविनय विनायक दामले

  आभारी आहे

 3. Ajitkumar Patil

  छान व उपयुक्त माहिती आहे अभिनंदन …

Did you like this article??